Friday, October 12, 2012

बेळगाव चे बेळगावी झाले,महाराष्ट्रात तोडफोड करून राजकीय पक्षांना काय मिळाले?


फितूरीचा शाप मराठीजनांना इतिहासकालापासून आहे.आपल्या बांधवांना मदत न करता त्याचे पाय ओढत राहणे ही खेकड्याची प्रवृती मराठी लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.

काल परवाचे बेळगावचे उदाहरण यासाठी उत्तम आहे.मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र न येता प्रत्येक पक्ष आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत होता.मिडीयासमोर गाजावाजा  करून राष्ट्रपतींना पत्र पाठविणे किंवा नुसत्याच डरकाळ्या फोडत महाराष्ट्रात बसून राहणे हे फक्त लोकांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठीच आहे.

या राजकारणी लोकांना खरोखरच जर सीमाभागातील जनतेची काळजी वाटत असती तर सर्वपक्षीय मंडळीनी राष्ट्रपतींना भेटून आपली एकी दाखविली असती.महाराष्ट्रात बंद करून व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करून राजकीय पक्षांनी काय साधले तेच कळत नाही.कोल्हापूरातील एक बोलके उदाहरण यासाठी पुरेसे आहे,बंद दिवसी ग्रामीण भागातून शहरात भाजीपाला विकण्यास आलेल्या एका वृध्द आजीचा भाजीपाला विस्कटण्यास या मंडळीना पुरूषार्थ वाटतो.विधानभवनाचे उद्घाटन बेळगावाला चालू असताना काही लोक आपल्याच बांधवांना नुकसान पोहचवत होते.नक्की यांचे आंदोलन कुणासाठी चालू आहे हेच कळत नाही.

सत्ताधारी पक्षाची स्थिती तर यापेक्षा वेगळी नाही.वेगवेगळी वक्तव्ये करून महाराष्ट्रातील आणि सीमाभागातील जनतेला मुर्ख बनविण्यात हे लोक वाकबगार आहेत.सीमाभागातील जनतेसाठी या सर्वपक्षीय लोकांना खरोखरच काही करावयाचे असेल तर या लोकांनी दिल्लीत विशाल मोर्चा काढून मराठीजनांची एकजूट दाखविली असती.पण सर्वच पक्षांना मताच्या लाचारीसाठी हा विषय चघळत ठेवायचा आहे असे एकंदरीच त्यांच्या वर्तनावरून वाटते.

जनतेच्या सहनशीलतेचा या लोकांनी जास्त अंत पाहू नये नाहीतर एक दिवस जनताच हाती मशाल घेऊन राजकारणी लोकांना धडा शिकवेल.  

Thursday, October 4, 2012

पैसा पाण्यात गेला


महाराष्ट्र राज्य प्रगतशील आहे असे म्हटले जाते पण महाराष्ट्रात प्रगती फक्त उद्योगपतींची होते आहे.महाराष्ट्राशी नाळ जोडलेला शेतकरी यापासून दूरच आहे.

देशातील सर्वाधिक आत्महत्या आज महाराष्ट्रात होतात,हे आपल्यासाठी खूपच लाजीरवाणे आहे.गडचिरोली,मेळघाट सारख्या ठिकाणी कुपोषणाच्या समस्या आहेत,त्यातच नक्षलवादाची भर आहे.विदर्भात तर कायमच दुष्काळी  परिस्थिती असते.महाराष्ट्राची प्रगती नक्की कशाच आहे हेच कळत नाही.

आज महाराष्ट्रात सर्वात जास्त पैसा जलसिंचनाच्या योजनेसाठी खर्च होतो.काही योजना तर दोन-तीन दशके चालू आहेत.काही कोटीचा खर्च हजारो कोटीवर जातो.यामधील फायदा कंत्राटदार,सरकारी अधिकारी तसेच राजकारणी लोकांत विभागला जातो.सदोष योजनेमुळे धरणातून होणाऱ्या पाणी गळतीचे प्रमाण तर खूपच लक्षणीय आहे.

धरण परिसरात टुमदार बंगले बांधून राहणाऱ्या अधिकारी,राजकारणी लोकांना  सर्वसामान्य  जनतेचे अश्रू दिसत नाहीत.धरणे जनतेसाठी नव्हे तर कंत्राटदार,सरकारी अधिकारी तसेच राजकारणी लोकांसाठी बांधली जातात असे आता खरोखरच वाटू लागले आहे.

नदीजोड योजना राबवून दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य आहे.पण जनतेचा पैसा पाण्यात वाहून गेला तरी सरकारला अजून जाग आलेली नाही.                


Thursday, September 13, 2012

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हवाच



लवकरच बाप्पा आपल्या भेटीस येत आहेत.मराठी माणंसामध्ये गणेशोत्सवाचा आनंद काही वेगळाच असतो.या सणासाठी जशी सासुरवाशीनींना माहेरी जाण्याची ओढ लागते तशीच ओढ नोकरी-धंद्यामुळे विखूरलेल्या मराठीजनांना आपल्या गावी जाण्यासाठी लागते.

सध्या या उत्सवाला व्यावसायिक रूप येऊ लागले आहे.गणेशोत्सवाचे मुळ स्वरूप बदलत चालले आहे.व्यसनाच्या जाहिराती गणेश मंडळाच्या कमानीवर झळकू लागल्या आहेत.आजकाल तर शहरासोबत ग्रामीण भागातही डॉल्बीचे स्त्रोम माजले आहे.डॉल्बी वाजविताना वृध्द लोक,गरोदर स्त्रिया,लहान मुले यांचा विचार न करता तरूण मंडळी आपल्या नाचगाण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत

डॉल्बीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सरकारने आता सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी वाजविण्यावर बंदी आणणे गरजेचे आहे.डॉल्बीऐवजी पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे ग्रामीण कलाकारांना संधी मिळेल तसेच आपल्या संस्कृतीचे जतनही होईल.          

गुटखाबंदीचा महाराष्ट्र शासनाचा स्वागतार्ह निर्णय


महाराष्ट्र सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला याबद्दल सर्वप्रथम शासनाचे आभार.या पदार्थामधील निकोटीन या घटकामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजार होतो.आजच्या तरूण पिढीमध्ये हे पदार्थ खाण्याचे प्रमाण खूपच आहे.

कॅन्सरसारख्या आजारामुळे आई-वडिलांना आपल्या तरूण मुलाला गमाविण्याची वेळ येते.ज्या वयात आई-वडिलांना आधार देणे गरजेचे आहे त्याच वयात मुलासाठी आक्रोश करण्याची वेळ पालकांवर येते यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते ?

गुटखा आणि पानमसाल्यावर  बंदी आणल्यामुळे गुटखा उत्पादकांनी मावा,सुपारीमिश्रीत गुटखा असे पदार्थ बाजारात आणले आहेत.या सर्वच पदार्थावर बंदी आणणे गरजेचे आहे,तसेच परराज्यातून गुटखा आणून महाराष्ट्रात काळ्या बाजारात विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे,तरच बंदीचा फायदा होईल,नाहीतर व्यापारी लोकांना काळ्याबाजारात असे पदार्थ विकून बक्कळ पैसा कमाविण्याचे आणखी एक साधन मिळेल.       

Wednesday, August 29, 2012

न्यायालये अधिक सक्षम असावीत

माझ्या लिखाणामुळे महनीय न्यायालयाचा अवमान होत असेल तर प्रथम मी त्यांची माफी मागतो.

आजकाल भारतात गुन्हेगार उजळ माथ्याने वावरत असतात.राजकीय लोक शेकडो कोटीचे गैरव्यवहार करतात,तो खटला कित्येक वर्ष लांबविला जातो.शेवटी हे लोक निर्दोष सुटतात,वर  काही महिन्याची शिक्षा झालीच तर जेलमध्ये राजेशाही मुक्कामाची सोय केलेली असते.

श्रीमंताची बिघडलेली मुले बेदकारपणे गाडी चालवून रस्त्यावरील लोकांचे बळी घेतात,मुंबई,दिल्ली ,बेंगलोर व अनेक ठिकाणी अशी उदाहरणे घडलेली आहेत.यांना शिक्षा किती मिळते याचा मागोवा घेतला तर 90 टक्क्याहून अधिक केसमध्ये हे लोक निर्दोष सुटलेले आहेत.

आपली काही आदर्श कलाकार मंडळी अंमली पदार्थ बाळगणे,रात्री पार्ट्या करून लोकांना त्रास देणे अशा कामात  अग्रेसर असतात या लोकांना न्यायालय ताकीद देऊन सोडून देते.

वरीलपैकी एखादी घटना सर्वसामान्य नागरिकांने केलेली असली तर न्यायालयाच्या चकरा मारून त्याचे आयुष्य उध्वस्त व्हायची वेळ येते.

भारतातील खूप घटनांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की न्यायालयाच्या निकालात विरोधाभास दिसून येतो.श्रीमंताना व गरिबांना एकच कायदा असतो पण निकाल वेगवेगळा असतो.काही निकाल याला फक्त अपवाद आहेत.

केसचा निकाल लांबला तर श्रीमंताना फारसा फरक पडत नाही पण गरिबांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

ऩ्यायालयाने अधिक सक्षम बनून लवकरात लवकर  कोणत्याही घटनेचा निकाल देणे गरजेचे आहे  तरच लोकांचा न्यायमंदिरावर विश्वास जडेल.तारीख पे तारीख करत सर्वसामान्य लोकांचे आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी आता महनीय न्यायालयाने घेणे गरजेचे आहे.

Tuesday, August 28, 2012

टोलधाड थांबविता येईल का ?

आज महाराष्ट्र सरकार वेगवेगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा हे सुत्र अवलंबत आहे.मुळात एखादा प्रकल्प बनविण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या हजारो पटीने कंत्राटदार नफा कमावतो.जेव्हा तो प्रकल्प सरकारला हस्तांतरण केला जातो तेव्हा तो  वापरण्यायोग्य राहिलेला नसतो.

आज रस्ते विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रात टोलधाड चालू आहे.रस्ते विकास महत्त्वाचा असला तरी तो लोकांच्या सहभागातून करणे शक्य आहे.शासकीय रोखे काढून रस्त्यांचा विकास केला तर कमी खर्चामध्ये रस्त्यांचा विकास करणे शक्य आहे.काही वर्षाकरिता सरकारने जरी स्वत: टोल घेतला तरी त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होऊ शकतो. 

कंत्राटदार रस्ते,धरण,पूल बांधण्यासाठी काही कोटी खर्च करतात व वीस-तीस वर्ष टोल वसूल करून हजारो कोटी वसूल करतात.विशेष गोष्ट नमुद करावी वाटते की त्या कामाचा दर्जाही ठिक नसतो.

सरकारने आता खाजगी कंत्राटदारांना सवलती देण्यापेक्षा कर्जरोखे काढून महाराष्ट्रात वेगवेगळे प्रकल्प राबवावेत जेणेकरून टोलधाडीतून जनतेची मुक्तता होईल.



  




Friday, August 17, 2012

सरकारच्या डोळ्यावर झापड आले आहे का?




दंगलीच्या भितीने जीवाच्या आकांताने हजारो नार्थ-ईस्ट मधील बांधव आपल्या घरी परतत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना,बांग्लादेशी गुप्तहेर संघटना ,जिहादी संघटना यांनी आखलेल्या कटास यश येण्याची भीती आहे.पध्दतशीरपणे सोशल मिडियाचा वापर करून दंगली भडकविण्याचे कारस्थान रचले गेले.सरकारला दंगलीवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णत: अपयश आले आहे.

आज आसाम हे गेटवे ऑफ बांग्लादेश बनले आहे.स्थानिक आसामी नागरिकांना लक्ष करून बांग्लादेशी घुसखोरांनी आपले प्रस्थान थाटले आहे.मताच्या लाचारीमुळे सरकार काहीच करत नाहीत.पुर्वेकडील राज्यामध्ये आज आपल्याच देशाविषयी असंतोष वाढत आहे.हजारो लोक जर परत पूर्वेकडे गेले तर परत एकदा असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता आहे.  

चिकन नेक नावाने ओळखला जाणारा 24 किमी लांबीचा भूभाग जो भारतास नार्थ-ईस्टकडील राज्यांस जोडतो तो तोडून नवीन देश वसवायचे कारस्थान काही वर्षापासून रचले जात आहे.या भागात बांग्लादेशी घुसखोरांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे.

दररोज सहा हजाराहून अधिक बांग्लादेशी अवैध मार्गाने भारतात प्रवेश करतात.मतासाठी राजकीय दलाल त्यांना ओळखपत्रे,रेशनकार्ड ,निवासी दाखला देण्यास तत्पर असतात.स्थानिक जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी या राजकीय लोकांना निर्वासितांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटतात कारण उद्याची ती त्यांची मतपेढी असते.

सरकारने या निर्वासितांचा बंदोबस्त करून स्थानिकाकडे लक्ष दिले पाहिजे.नाहीतर उद्या भारताची आणखी छकले पडण्याची शक्यता आहे.

सरकार आतातरी आपल्या डोळ्याची झापड उघडेल का ? 
    

  

Tuesday, August 14, 2012

जातीयवाद्यांचा मुंबईला विळखा

आसाम दंगलीचे निमित्त करून मुंबईत दंगल पध्दतशीरपणे  घडविली  गेली.मुळात आसाममधील दंगलीत स्थानिक नागरिकांचे जीवित व वित्तिय नुकसान अधिक झाले आहे.पण समाजविघातक लोकांना दंगलीचे कारण हवे होते.

काही संघटनांना व पक्षांना बांग्लादेशी घुसखोरांचा पुळका का आला ते न कळायला जनता दुधखूळी नाही.मताच्या लाचारीसाठी व धार्मिक फायद्यासाठी बांग्लादेशी घुसखोरांचे लांगुलचालन  राजकारणी लोकांनी चालविले आहे.

स्थानिक लोकांचे अधिकार डावलून या लोकांना महत्त्व दिले तर हेच लोक आपल्यावर उलटतील,मुंबईत घडलेली घटना हे याचे जिंवत उदाहरण आहे.घरी विषारी साप पाळला तर तो आपल्याला कधी तरी चावणारच पण गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या राजकर्त्यांना हे कळणार कधी ????????

या दंगलीत बांग्लादेशी घुसखोर,अंडरवर्ल्डचे लोक ,पाकिस्तानधार्जिने सहभागी झाले होते,सरकारने या लोकांना वेळेच ठेचले पाहिजे नाहीतर हा वणवा महाराष्ट्राच्या इतर भागात पसरायला वेळ लागणार नाही.         

Sunday, August 12, 2012

भारतीय संस्कृतीचे धिंडवडे


आजकाल भारतात काही गल्लाभिरू चित्रपट निर्मात्यांनी  व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचे धिंडवडे चालविले आहे, त्याला सेन्सार बोर्डात बसविलेले ठोकळेसुध्दा जबाबदार आहेत.

मुळात  सेन्सार बोर्डाच्या सदस्यांनी हे पद फक्त मिरविण्याचे साधन बनविले आहे.जिस्म,राज,मर्डर सारख्या चित्रपटांतील अश्लिल दृश्यांना परवानगी देऊन हे सदस्य भारतीय संस्कृतीची चिरफाड करत आहेत आणि काही  गल्लाभिरू निर्मातेही याला तितकेच जबाबदार आहेत.सर्वप्रथम  सेन्सार बोर्डाच्या  ठोकळ्यांची बोर्डातून हकालपट्टी केली पाहिजे.

आज भारतीय मिडियासुध्दा सनी लियोन या  जिस्म चित्रपटाच्या तारकेचा उदोउदो करून तिच्या मुलाखती घेत आहेत हे पाहून भारतातील मिडियाने खालची पातळी गाठली आहे असे वाटू लागले आहे.

एका बाजूला लोकांना भारतीय संस्कृतीचे धडे द्यावयाचे तर दुसऱ्या बाजूला अनैतिक गोष्टींना महत्व द्यावयाचे यावरून भारतीय मिडियाचा दुटप्पीपणा उघडा पडला आहे.

मुळात भारतीय मिडियाला  नैतिकता उरली आहे तरी कुठे ?


        

Thursday, August 9, 2012

अण्णांच्या भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची इतिश्री

भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची इतिश्री

लोकपाल आंदोलन तडीस नेण्याची गर्जना करणाऱ्या टीम अण्णाने शेवटी नांगी टाकलीच.या टीमने भीमगर्जना करत निवडणूकीत सामील होण्याची घोषणा केली.निवडणूकीमुळे या मंडळीचा भष्ट्राचाराचा मुळ मुद्दाच बाजूला होण्याची शक्यता जास्त आहे.

कारण निवडणूकीसाठी ही मंडळी कोणाचा पैसा वापरणार आहेत हेच मोठे गुढ आहे.कारण भष्ट्र मंडळी,काळा पैसावाले,लुटारू व्यावसायिक हेच आपल्या फायद्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना देणग्या देतात.

या टीममधील मंडळीच्या सुरूवातीपासूनच्या एकंदर वर्तणूकीवरून ही मंडळी आपल्या फायद्यासाठी व प्रसिध्दीसाठी हे आंदोलन करत होते काय असे आता वाटत आहे.

पण   निवडणूकीत सामील होण्याची घोषणा करून या मंडळीनी  भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची धार बोथट करून टाकली असे मानावयास हरकत नसावी.  

Monday, July 30, 2012

मॉं,माटी आणि मानुष

आपल्या स्वत:च्या भूमीत परकीयाचे होणारे आक्रमण,भूमिपुत्रांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करते.आज महाराष्ट्रासह काही पुढारलेल्या राज्यात हीच परिस्थिती आहे.

ईशान्येकडील राज्ये आसाम,अरूणाचल प्रदेश,मेघालय,मिझोराम,नागालँड,मणिपुर आणि त्रिपुरा ज्यांना सात भगिनी असेही म्हटले जाते तेथे आज परिस्थिती खूपच चिघळलेली आहे आणि याला कारणीभूत आजचे राजकर्ते आहेत.बांग्लादेशी घुसखोरांनी ईशान्य भारतातील भूमिवर उच्छाद मांडला आहे.दडपशाहीने तसेच धर्मांतर करून त्यांनी स्थानिकांचे वर्चस्व संपविले आहे.आज तेथील स्थानिक बोडो,आसामी,नागा ,संथाली अशा अनेक आदिवासी जमातीचे आस्तित्व संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती आहे.

आज सीमावर्ती भागात या घुसखोरांची संख्या स्थानिकापेक्षा वाढली आहे.आपल्या लोकसंख्येच्या जोरावर आणि स्थानिक राजकर्त्यांना हाताशी धरून या लोकांनी भूमिपुत्रांना त्रास द्यावयास सुरूवात केली आहे.

सध्या चालू असलेले आसाममधील दंगे हे याचेच उदाहरण आहे,पण मताला लाचार झालेल्या राजकर्त्यांना भूमिपुत्रांचे दु:ख थोडेच कळणार आहे आज आसाममध्ये भूमिपूत्रांचा पेटलेला वणवा वेळीच विझवला नाही तर संपूर्ण ईशान्य भारत आपण गमावून बसविण्याची भीती आहे.

आपले परकीय शत्रू यासाठीच तर आसुसलेले आहे,पण राजकर्त्यांना भूमिपुत्रांचे अश्रु पुसायला वेळ आहे कुठे ?

Friday, July 27, 2012

एकदिवसीय पावनखिंड मोहिम,अविस्मरणीय अनूभव


पावनखिंडीच्या एकदिवसीय मोहिमेचे उत्सुकता एक महिन्यापासून डोक्यात होती.पन्हाळा ते पावनखिंड हे अंतर अंदाजे 55 ते 60 कि.मी. असल्यामुळे एका दिवसाची ही मोहिम पूर्ण करू शकेन याबद्दल मी स्वत:च साशंक होतो.डॉ.अमर आडके,बी.बी.पाटील,हणमंतराव नलावडे,विद्याधर दुर्गूळे,दिपक सावेकर आदि कसलेल्या शिलेदारांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम होणार होती,त्यामुळे थोडासा निर्धास्तपण होतो.

मोहिमेची पूर्वतयारी म्हणून शूज,खाण्याचे पदार्थ तसेच मोहिमेदरम्यान येणाऱ्या गावातील लहान मुलांना वाटण्यासाठी बिस्किटे,चॉकलेट आदि पदार्थ सोबत घेतले.
मोहिमेची सुरूवात,बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशिद यांच्या पुतळ्यास वंदन करून झाली 
पहाटे साडेतीन वाजता गंगावेश(कोल्हापूर)येथे सर्वांना जमा होण्यास सांगितले होते.मोहिमेचा विचार करतच मी रात्री झोपी गेलो.झोपताना वाटून गेले की पहाटे लवकर उठलो नाही तर मोहिमस जाता येणार नाही.पण मनात प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.मला तीन वाजण्याच्या अगोदरच जाग आली.मी सामानाची आवराआवर करून गंगावेसकडे निघालो.

जंगलातून वाटचाल
गंगावेसला अगोदरच बरेच मावळे आले होते.चार वाजता सर्वजण पन्हाळ्याकडे निघाले.पाच वाजण्याच्या सुमारास वीर शिवा काशीद तसेच बाजीप्रभूच्या पुतळ्यास वंदना करून सर्वजण राजदिंडीमार्गे विशाळगडाच्या मार्गाकडे निघाले.याच मार्गावरून छत्रपती शिवाजीराजे सिद्दी जौहरच्या तावडीतून निसटून विशाळगडाकडे गेले होते.आज आम्ही सर्वजण त्याच मार्गाने पावनखिंडीकडे चाललो होतो.सुरूवातीच्या काही मिनिटातच पावनखिंडीच्या मोहिमेतील अवघडपणा लक्षात आला.पहाटेची वेळ असल्यामुळे प्रकाश थोडासा अंधूकसा होता त्यामुळे सर्वजणांनी विजेऱ्यांचा आधार घेत मार्गक्रमण करण्यास सुरूवात केली.

अंधारातून मार्गक्रमण
साडेतीनशे वर्षापूर्वी बारा जुलैच्या रात्री याच मार्गाने मशालींचा वापर करून छत्रपती कसे निसटले असतील असा विचार मनी करत मी मार्गक्रमण करत होतो.छत्रपती वेढ्यातून निसटले ती रात्र पोर्णिमेची होती.मुसळधार पाऊस,ढगाळ हवामान,घनदाट जंगल याशिवाय सिद्दीच्या सैनिकांचा पाठलाग अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या राजाला विशाळगडाला पोहचविणे मावळ्यांना किती जिकिरीचे होते हे पावनखिंडीचा मार्गाने जाताना हळूहळू कळू लागले.


थोडीसी विश्रांती
राजदिंडीतून खाली उतरून तुरूकवाडी,म्हाळूंगे पार करून आम्ही मसाई पठार चढू लागलो.मार्गावर मोठमोठाले दगड,निसरडा रस्ता,सोबत पावसाची 
साथ यामुळे सर्व मावळ्यांची पुरती दमछाक होऊन गेली.मसाई पठारावर पोहचल्यावर थोडासा आराम करून आम्ही पठार चालू लागलो.मसाई पठार म्हणजे जणू काही सह्याद्रीचे छप्पर आहे.


अंदाजे दहा ते बारा कि.मीलांब असणाऱ्या विशाल अशा पठारवरून दिसणारे पन्हाळ्याचे सुंदर रूप डोळ्यात साठवून सर्व मावळ्यांनी मसाई पठार पार केले.
मसाई  पठारानंतर कुंभारवाडीचाफेवाडीमांडलाईवाडीचा टप्पा पार करून सर्वांनी न्याहारी घेऊन थोडासा आराम  केलापावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अगदी खुलून गेलेले असतेडोंगरउतारावरील भातशेतीहिरवीगार वनराईगर्द झाडी,धबधबे जंगलातून गेलेली पायवाट जणून काही सृष्टीच्या चित्रकारांने आपले सर्व रंग उधळले आहेत.
मुलांना खाऊ वाटप 

वाटेत ठिकठिकाणी लहान मुलांना खाऊचे वाटप करत मावळ्यांचे मार्गक्रमण चालू होते. मोहिमेदरम्यान येणाऱ्या ओढ्यात आंधोळ करून ताजेतवाने होऊन सर्वजण परत नव्या जोमाने चालू लागले.मांडलाईवाडीनंतर करपेवाडीआंबेवाडी,


कळकेवाडीपाटेवाडीसुक्यामाचा माळ,मासावडे करत सर्वजण पांढरेपाणी या ठिकाणी पोहचलोपांढरेपाणी ते पावनखिंड हे अंतर अंदाजे सात कि.मीआहे.

पावनखिंडीत पोहचल्यावर शिवरायांची वंदना करून,धारातीर्थी पडलेल्या सर्व पराक्रमी मावळ्यास वंदन करून पुढील वर्षी परत येणाचा निर्धार करून मोहिमेची सांगता झाली.कोल्हापूरपुणे,नाशिक,मुंबई आदि ठिकाणाहून अंदाजे दिडशे मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते.

इतिहासात प्रसिध्द असणाऱ्या पावनखिंडीच्या युध्दाची सुरूवात पांढरेपाणी या ठिकाणाहून झाली होती व शेवट पावनखिंडीत झाला.बाजीप्रभूफुलाजीप्रभूहैबतराव शिळीमकररायाजी बांदल आदि पराक्रमी मावळ्यांनी जिवाची बाजी लावून खिंड लढविली.सतत बारा तास चालून दमलेल्या तीनशे मराठ्यांनी थकून न जाता आदिलशाहच्या विशाल अशा सेनेबरोबर नऊ तास झुंजून खिंड रोखून धरली त्यामुळे छत्रपती शिवरायांना विशाळगडाकडे जाण्यास अवधी मिळाला.


मोहिमेची सांगता
बाजींच्या देहाची चाळण झाली असतासुध्दा त्यांचे कान विशाळगडाकडे लागले होते,कारण महाराज विशाळगडावर पोहचल्यानंतर तोफेची सलामी होणार होती.इकडे विशाळगडावर आदिलशाहच्या सरदारांचा वेढा लागला होता.तो वेढा तोडून महाराज विशाळगडावर पोहचले आणि तोफेची सलामी झाली.

तोफेचा आवाज ऐकल्यानंतर बाजींनी आपले प्राण सोडले,घोडखिंड कायमची इतिहासात पावन झाली.पावनखिंडीतल्या या रणसंग्रामात सर्वच्या सर्व तीनशे मावळे मारले गेले.

धन्य ते वीर ,धन्य ती त्यांची स्वराज्यनिष्ठा






Thursday, July 19, 2012

भारताचे कचखाऊ परराष्ट्रीय धोरण

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे परराष्ट्रीय धोरण अगदी कीव करण्याजोगे आहे.

इवलासा पाकिस्तान आपला फणा काढून नेहमीच  फुरफूरत असतो.पूर्वेच्या व उत्तरेच्या सीमा चीन गिळंकृत करत आहे.

पूर्वकडे बांग्लादेशीयांचे लोंढे वाढत आहेत.आपण मात्र प्रत्येक वेळी सहिष्णूतेचे धोरण अमलात आणूऩ डोळ्यावर कातडी पांघरून बसलो आहे.

परकीयांच्या आक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिल्लीचे राजसिंहासन पृथ्वीराज चौहानाच्या ताब्यातून जाऊन परकीयांच्या ताब्यात आले .हीच चूक आपण परत एकदा करतो की काय याची भीती वाटत आहे,आता दिल्लीच नाही तर संपूर्ण देशातच असुरक्षित वातावरण आहे.आज देशात सर्वसामान्य नागरिक,महिला सुरक्षितपणे रस्त्यावर फिरू शकत नाहीत.

समोरासमोर युध्द करता येत नसल्यामुळे चीन पाकिस्तान ,नेपाळचा वापर आपल्याविरूध्द करत आहे.नेपाळची राजेशाही संपवून माओवादी सत्ता आणण्यास चीनच कारणीभूत आहे.

आज भूतान सारख्या छोट्या देशावर त्याची नजर आहे.भूतानमध्ये मार्क्सवादी विचारसरणीच्या पक्षाचे प्राबल्य वाढत आहे.जी गोष्ट नेपाळमध्ये केली तीच चीन भूतान मध्ये करू पाहात आहे,पण आपल्या राजकर्त्यांच्या नजरेत ही गोष्ट कधी येणार हेच कळत नाही.   

चीनने पोसलेला  लाल नक्षलवाद तर आपल्या दारात आहे.याला आपण वेळीच ठेचले नाही तर उद्या आपलीही अवस्था बिकट होणार आहे.दरवेळी अमेरिकेकडे आशाळभूत नजरेने पाहण्यात काहीच उपयोग होणार नाही.इस्त्रायल सारखे आक्रमक धोरण अवलंबून आपण परकीय तसेच नक्षल्यांचा कायमचा बंदोबस्त  केला पाहिजे.

आपले परकीय धोरण बदलायची वेळ येऊन ठेपलेली आहे.