Monday, December 19, 2011

दिल्लीच्या तख्तावर परत एकदा मराठ्यांनी चाल करून जाण्याची वेळ आली आहे.

गेल्याच आठवड्यामध्ये कर्नाटक सरकारने बेळगाव महानगरपालिका विर्सजीत केली.सीमाभागातील मराठी बांधवावर गेली पन्नास वर्ष अत्याचार होत आहे.पण प्रत्येक वेळी केंद्रातील सरकारने आपले हित जोपासत विलीनीकरणाचा विषय लांबविला.

सीमाभागातील मराठी जनतेची परिस्थिती मोठी बिकट आहे.त्यांना धड कर्नाटकात नोकरी मिळते ना महाराष्ट्रात मिळते.मराठी तरूणांना खोट्या गुन्ह्याखाली तुरूंगात अडकवून कर्नाटक सरकार त्यांचा छळवाद मांडते.महाराष्ट्र सरकारने सीमाभाग केंद्रशासित करावा म्हणून ठराव केला पण नुसता ठराव करून काहीच होणार नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दिल्लीत महाराष्ट्रातील लाखो लोकांनी विशाल मोर्चा काढून सरकारला आपली ताकद दाखविली पाहिजे.दिल्लीच्या तख्तावर परत एकदा मराठ्यांनी चालून जाण्याची वेळ आली आहे.

सीमाभागातील दोन पिढ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला,आता तिसरी पिढी जन्माला आली आहे,त्यांच्या भवितव्यासाठी तमाम मराठी जनांनी एक होण्याची वेळ आली आहे.
इतिहास सांगतो जेव्हा मराठी एक झाले तेव्हा त्यांनी दिल्ली काबीज केली.मराठी जनांनी एकत्र येवून हा लढा अधिक तीव्र केला तरच बेळगाव,कारवार,निपाणी,हुबळीसह संयुक्त महाराष्ट्र होऊ शकतो....
यावेळी मला कवीवर्य राजा बढे यांच्या पंक्ती आठवितात.

                   काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी,
                   पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी,
                   दरिद्र्याच्या उन्हात शिजला,
                   निढळाच्या घामाने भिजला,
                   देशगौरवासाठी झिजला,
                   दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा ।।