Monday, December 13, 2010

आजच्या तरूणाला महाराष्ट्र धर्माची शिकवण देण्याची गरज आहे ?

सध्या महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी प्रेमाच्या उकळ्या फुटत आहेत.पण खरोखर मराठी-मराठी करून आपले प्रश्न सुटणार आहेत ?  

आजवर सर्वच राजकीय पक्षांनी मराठी तरूणांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला आहे.सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपण का मागे पडत आहोत ,याचा मराठी तरूणाने खरोखर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

राजकीय पक्षांच्या आंदोलनात सहभागी होऊन स्वत:  मार खावयाचा वर एखादा गुन्हा नोंद झाला की सगळेच मार्ग बंद होतात,आजवर कोणत्या राजकीय पुढार्‍याने मार खाल्ला आहे ? याचा आपण विचार कधी केला आहे ?  मग एखाद्या राजकीय नेत्याच्या मागे फरफटत जाऊन त्या नेत्यामध्ये आपले भविष्य शोधावयाचे हे कितपत योग्य आहे.आपले आई-वडील आपल्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने पाहतात ती आपणांस खरी करावयाची आहेत.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकावयाचे असल्यास मराठीबरोबर इंग्रजी, हिंदी तसेच एखादी परदेशी भाषा अवगत असल्यास आपणांस अधिक संधी मिळेल.मराठीचा अभिमान जरूर बाळगा पण  नुसताच मराठीचा बाऊ करून आपले प्रश्न सुटणार नाहीत.आज भारतीय प्रशासकीय सेवेत मराठी तरूणांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण  खुपच कमी आहे.उद्योगधंद्या मध्ये तर यापेक्षा मराठी तरूणांची वाईट परिस्थिती आहे,खूप कमी  मराठी तरूण आज उद्योगधंद्यामध्ये आहेत.जोपर्यंत मराठी तरूणामधला न्यूनगंड कमी होत नाही तोपर्यंत सर्वच क्षेत्रात आपण मागे राहणार आहोत.   

छत्रपति शिवरायांनी शून्यातून स्वराज्य उभे केले,स्वराज्य उभे करत असतांना स्वकीय तसेच परकिय या दोहोंकडून झालेली शेकडो संकटे पचवून त्यांनी मराठी साम्राज्य उभे केले व महाराष्ट्र धर्म वाढविला .आज आपणांवरी एखादे छोटेसे संकंट आले तरी आपण कोलमडून जातो.अशावेळी छत्रपति शिवरायांचे विचार आपण अमलांत आणले ,तर आपण कोणतीही अशक्य गोष्ट साध्य करू शकता .

चल मग मित्रा करतोस ना सुरूवात आत्तापासूनच,एक सशक्त, समृध्द, उद्यमशील महाराष्ट्र घडविण्याची...